"एक गोडी बाभळ आणि माझ्या बालपणीच्या आठवणी "

उन्हाची तीव्रता आणि अंगाची लाही..

' नेहमीच येतो उन्हाळा ' या वक्तीप्रमाणे उन्हाळा दरवर्षी आपल्या जीवनात येतो. लहानपणी माझा सगळ्यात आवडता असणारा ऋतू उन्हाळा. यावरती मी आधीच्या ब्लॉग वरती लिहिलेच आहे. लहानपणीच्या त्या अनेक असंख्या आठवणी आजही  मनाच्या कोपऱ्यामध्ये ताज्या आहेत. आता गाव सुटलं, तशा त्या आठवणीही मागे सुटत गेल्या. शाळेच्या सुट्टीत मनसोक्त जगलेला उन्हाळा. आज मात्र मला बोचरा वाटत होता.

 वर्तमानपत्रात रोजच उन्हाची तीव्रता वाचत होतो. कधी 42, 43, अगदी 45,46 ही त्याची तीव्रता आकड्यांमध्ये मोजत होतो. विज्ञानाच्या सुख -सोयींनी झालर पांगरलेला मी. आज माझ्याकडे स्लॅबच घर आहे. फॅन आहे,कुलर आहे. तरीही या उन्हाळ्यापासून मी का बेचैन आहे? आधी तर हे माझ्याकडे काहीच नव्हतं. तरी मी किती आनंदी होतो.

माझगाव माझ्या आठवणी
 लहानपणीच्या आठवणीतील बाभळीचे झाड 


 काय होतं माझ्या सुखाचं, माझ्या आनंदाचे कारण? आज माझं मन पुन्हा जुन्या आठवणी इकडे खेचू लागलं. या उन्हाची कसलीही तमा न बाळगता, मन तिच्या सावलीत बागडू लागलं. सिमेंटच्या जंगलातून मला खेचून आणणारी आणि या रखरखत्या उन्हामध्ये तिच्या सावलीमध्ये बागडायला लावणारी. कोण होती ती? ती होती माझ्या लहानपणीच्या आठवणीतील,   " एक गोडी बाभळ"!

 दारातील गोडी बाभळ आणि माझं बालपण..

 जगलेले ते लहानपणीचे सुवर्ण दिवस माझ्या डोळ्यासमोरून वाहू लागले. भीमा नदीच्या काठी असलेले छोटसं आमचं खेडेगाव. आमचं घर हे रानामध्येच होतं. आमच्या आजोबांनी बांधलेलं माळवादाचा 10 खानाचं  घर!. घराच्या भोवती मोठमोठ्या  दगडांची भिंत होती. आम्ही तिला पोवळ म्हणत असू. त्या पोवळीच्या भोवतीनेच बाहेरून गुरांची दावण  बांधलेली असे. त्या पोवळीला लागूनच बाहेरून  एक भले मोठ 'गोड्या बाभळीचे झाड' आमच्या घराच्या समोरच होत.

 मला लहानपणी ते झाड फक्त कधी झाड वाटलंच नाही. आमच्या घरातील एक सदस्यच ते वाटायचं. आमचं माळवादच घर. घरासमोर आईने शेणाने सारवलेला भला मोठा ओटा होता. आम्ही सर्वजण रात्रीच बाहेर त्या वोटयावरतीच झोपत असो. त्यावेळेस समोरच दिसणार ते बाभळीचे झाड! कितीतरी वेळ मी कौतुकाने पहात बसत असे. रात्रीच्या वेळी त्याच्या पिवळ्या फुलांचा मंद सुहास मनाला मोहून टाकत असे.

 दिवस उगवताच सूर्याची पडणारी कोवळी किरणे. त्या झाडाच्या कोवळ्या पानांना आणि नाजूक पिवळ्या फुलांना वेगळाच साज चढवत असे.

 तिची सावली म्हणजे मायेची माऊली.

 माझ सगळं बालपण तिच्या सावली मध्ये खेळण्यात गेलं. ती एक जुनी आणि गोडी बाभळ असल्यामुळे तिला काटे तसे कमीच होते.  छोट्या पिवळ्या फुलांनी, काट्यांनी भरलेलं बाभळीचं झाड. ते फक्त एक झाड नव्हतं. बाभळ  म्हटलं की लोकांना फक्त काटे दिसतात. पण आमच्यासाठी ते काटे कधी भीतीचे कारण बनलेच नाहीत. 

काट्यांचे खेळ: त्या बाभळीचे लांब पांढरे काटे तोडून आम्ही त्यापासून खेळण्यासाठी  भिंगरी तयार करत असे. पायामध्ये कधी काटा मोडला तर, तिचाच काटा आमच्या उपयोगी येत असे. नागपंचमीच्या सणाला त्या बाभळीच्या झाडाला झोका बांधलेला असे. पुढे आम्ही तो कितीतरी दिवस खेळत राहू. दिवाळीच्या सणाला आई तिच्या सावलीमध्ये शेणाने बनवलेल्या वासू बारशाची पूजा करत असे.

गावाकडील माझ्या लहानपणीच्या आठवणी
 सावली मध्ये खेळताना लहानपणाची आठवण 


 उन्हाळ्याच्या सुट्टी मध्ये अख्खा दिवस  तिच्या सावलीमध्ये खेळण्यात जाई.उन्हाळ्याच्या दिवसांत बाभळीच्या खोडातून निघणारा तो पिवळसर, चिकट डिंक गोळा करणे हा आमचा रोजचा उद्योग असायचा. तो डिंक वहीची फाटलेली पानं चिकटवण्यासाठी आमचा 'फेव्हिकॉल' असायचा. बाभळीला येणाऱ्या त्या वळणदार हिरव्या शेंगा गोळा करून आम्ही त्यांचे दागिने बनवायचो, तर कधी त्यांची एकमेकांवर फेकून मारामारी खेळायचो.

 बालपणीचा खरा सोबती ' बाभळ'

उन्हाळ्याची दुपार आणि बाभळीची सावली सुट्ट्यांमध्ये आई सर्व उन्हाळी काम तिच्या सावली करत असेल. शेवया करताना तिच्या सावली टिपाडावर  बसून फिरवलेला सोऱ्या आजही मला आहे तसा आठवत होता. दुपारचं कडक ऊन पडायचं, तेव्हा आई आम्हाला घराबाहेर पडू द्यायची नाही. अशा वेळी त्या बाभळीच्या झाडाची पांगळी, पण थंडगार सावली आमचा आसरा असायची.त्या झाडाच्या खाली बसून गोट्या खेळणं, विटीदांडूचे डाव रंगवणं आणि थकल्यावर त्याच झाडाच्या बुंध्याला पाठ लावून वाऱ्याच्या झुळकीसोबत झोपी जाणं… यात जे सुख होतं, ते आजच्या एसी (AC) रूममध्येही नाही.

 त्या बाभळीच्या पानांमधून गाळून येणारी उन्हाची कोवळी किरणं जमिनीवर जणू नक्षी काढायची. आम्ही त्या नक्षीवर पावलं ठेवत खेळत बसायचो.आमच्या सोबतीच्या त्या जुन्या बाभळीच्या झाडावर कितीतरी पक्षांची घरटी होती. सुगरण पक्षाने विणलेला तो सुंदर खोपा आजही डोळ्यांसमोर जसाच्या तसा आहे. सकाळी पक्षांचा किलबिलाट झाला की आमची झोप उडायची.

 घरातील सदस्यांसारखा उपयोग..

काट्यांनी भरलेलं बाभळीचं झाड. ते फक्त एक झाड नव्हतं, तर आमच्या कुटुंबाचा एक न बोलणारा, पण सगळं समजणारा सदस्य होतं. अनेक बाबतीत ते झाड आम्हाला उपयोगी पडायचं. माझ्या खेळण्यासाठी सोबतीला तर होताच. पण आमची काही गुरे कायम तिच्या सावलीत बांधलेले असे. आईने पाळलेल्या काही कोंबड्या खुरवड्यात न बसता, रात्रीच्या कायम तिच्या फांद्यांवर बसलेल्या असेत. शेतीसाठी काय अवजार बनवायचा असेल, तर घरचे लगेच तिचे लाकूड तोडत असे. या ना त्या अशा अनेक कारणांनी ते बाभळीचे झाड आमच्या घरासाठी. आमच्या घरातील एक सदस्य होत.

बाभळीची सावली आणि काही गुरे
 बाभळीच्या सावलीत काही गुरे 


 शेवटचा दुःखद निरोप..

 माझं संपूर्ण बालपण आनंदाने समृद्ध केलेलं ते बाभळीचे झाड. माझ्या आठवणींच एक अविभाज्य अंग होत. गावातून बाहेर पडल्यानंतर ही कधी गावाकडे गेलो तर, आठवणीने त्याच्या सावलीत जाऊन बसत असे. त्याच्या वयोवृद्ध झालेल्या खोडावरून मायेने हात फिरवत असे. त्यावेळी मनाला खूप जवळचा सोबती भेटल्याचं समाधान मिळत राही.

 कालांतराने ती जागा आमच्या चुलत्याच्या वाटण्याला गेली. कामानिमित्त मलाही जुन्या घराकडे खूप दिवस जाता आलं नाही. पण त्या बाभळीच्या झाडाच्या आठवणी कायम सोबत होत्या. काही दिवसांनी कळलं, चुलत्याने ते झाड जेसीबीने काढून टाकलं.

आयुष्यभर ज्या बाभळीच्या  झाडानं आईच्या मायेने साथ दिली. 'जातानाही त्याने आपल्या उपकाराणे कृतज्ञ केलंच होतं'."चुलीच्या सरपणासाठी ते बाभळीचे झाड जाता जाता चुलीमध्ये जळलं होतं "

 हे सगळं कळल्यावर पावले शेवटची एकदा जुन्या घराकडे वळली! तिथं माझा जुना सोबती,' बाभळीचे झाड नव्हतं ' होता फक्त जेसीबी ने पडलेला मोठा खड्डा. भरल्या डोळ्यांनी पावले खड्ड्याकडे वळली. काही तुटलेल्या मुळ्या अजूनही तिथेच होत्या. त्या मुळयांना हातात घेऊन, कितीतरी वेळ रडत बसलो होतो.

 आयुष्यभर मायेची सावली देऊन, त्याच मालकासाठी ते बाभळीचे झाड शेवटचं चुलीमध्ये जळलं होतं!

बाभळीचे झाड. गावाकडील एक आठवण
 आयुष्यभर साथ देणार बाभळीचे झाड 


 त्याच्या तुटलेल्या मुळ्या  एवढं सांगत होत्या, आता तुला खेळण्यासाठी माझी सावली कधीच नसेल. मला माफ कर. आणि मी मात्र पाठमोरं होऊन परतीच्या वाटेने चालू लागलो होतो....

झाड तर गेलंच, पण सोबतीने माझ्या लहानपणीच्या सुवर्ण आठवणी घेऊन गेलं.आज गावाकडे गेलो की ते अंगण रिकामं वाटतं. तिथे आता बाभळीच्या पिवळ्या धम्मक फुलांचा सुवास येत नाही की पाखरांचा चिवचिवाट ऐकू येत नाही.

 मित्रांनो, बाभळीचं झाड दिसायला जरी साधं आणि काट्यांचं असलं, तरी त्याने दिलेलं सुख आणि सावली कोणत्याही सुगंधी फुलांच्या झाडापेक्षा कमी नव्हती. भौतिकदृष्ट्या ते झाड आज तिथे नसेलही, पण माझ्या मनात आणि आठवणींत ते कायम हिरवंगार राहील.

तुमच्याही बालपणी अशाच एखाद्या झाडाशी, अंगणाशी किंवा गावांशी जोडलेल्या आठवणी आहेत का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा!

 आपलाच ब्लॉगर लेखक :

 कुलदीप लोंढे..

 


Follow me: Facebook | Instagram

Share: Twitter | WhatsApp WhatsApp

लेखक: कुलदीप लोंढे

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

"तुमचं मत नक्की कळवा! Google अकाउंट किंवा Anonymous म्हणून कमेंट करता येईल. तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहोत!"

Popular posts

😞 निःशब्द..... निरागस बाळा... 😞

प्रेमाच शव...हत्याकांडांच्या सावलीत..