"एक गोडी बाभळ आणि माझ्या बालपणीच्या आठवणी "

इमेज
उन्हाची तीव्रता आणि अंगाची लाही.. ' नेहमीच येतो उन्हाळा ' या वक्तीप्रमाणे उन्हाळा दरवर्षी आपल्या जीवनात येतो. लहानपणी माझा सगळ्यात आवडता असणारा ऋतू उन्हाळा. यावरती मी आधीच्या ब्लॉग वरती लिहिलेच आहे. लहानपणीच्या त्या अनेक असंख्या आठवणी आजही  मनाच्या कोपऱ्यामध्ये ताज्या आहेत. आता गाव सुटलं, तशा त्या आठवणीही मागे सुटत गेल्या. शाळेच्या सुट्टीत मनसोक्त जगलेला उन्हाळा. आज मात्र मला बोचरा वाटत होता.  वर्तमानपत्रात रोजच उन्हाची तीव्रता वाचत होतो. कधी 42, 43, अगदी 45,46 ही त्याची तीव्रता आकड्यांमध्ये मोजत होतो. विज्ञानाच्या सुख -सोयींनी झालर पांगरलेला मी. आज माझ्याकडे स्लॅबच घर आहे. फॅन आहे,कुलर आहे. तरीही या उन्हाळ्यापासून मी का बेचैन आहे? आधी तर हे माझ्याकडे काहीच नव्हतं. तरी मी किती आनंदी होतो.  लहानपणीच्या आठवणीतील बाभळीचे झाड   काय होतं माझ्या सुखाचं, माझ्या आनंदाचे कारण? आज माझं मन पुन्हा जुन्या आठवणी इकडे खेचू लागलं. या उन्हाची कसलीही तमा न बाळगता, मन तिच्या सावलीत बागडू लागलं. सिमेंटच्या जंगलातून मला खेचून आणणारी आणि या रखरखत्या उन्हामध्ये तिच्या सावलीमध्ये ...

माझ्या आठवणीचा हरवलेला उन्हाळा!

तळपत होता तो लाल बुंद होऊन,
अगदी सर्वांचा पिवळा पाचोळा करून..
नदी नाले गुपचूप पडलेले,
फक्त वावटळ झेपावत होती उंच हात करून..

उन्हाळ्यातील रखरखाटात एकटे उभे झाड
         कोरड्या वाळवंटात उन्हाच्या झळा झेलत                एकाकी पण धीराने  उभं असलेलं झाड… 

 उन्हाळ्याविषयी काही बोलक्या वाटणाऱ्या या काही ओळी.. तुम्ही - आम्ही या उन्हान हैराण झालेलो असताना या उन्हा विषय कोण कशाला काय लिहिलं. असाच प्रश्न तुम्हा सगळयांना पडला असेल ना? मी सुद्धा असाच खूप या उन्हाने हैराण होऊन गेलो होतो. सभोवताली सर्वत्र फक्त उजाड पिवळा पाचोळा झालेली धरणी माय दिसत होती. आणि मी या उन्हाच्या झळयातून थोडा तरी बचाव व्हा म्हणून एका झाडाच्या सावली खाली विसावलो होतो. पण गारवा मिळवून देईल ते ऊन कसलं, अगदी तप्त डोळे करून चारही बाजूने तो आग ओकत होता. अंगातून अगदी घामाच्या धारा निघेपर्यंत या उकाड्याने खूप जीव हैराण झाला होता. या उन्हाने जीव  हैराण होऊन  एका झटक्यात मनात विचार आला.          

           हा उन्हाळ्याच नसता तर?

 क्षणभर खूप भारी वाटलं मनाला. खरंच हा उन्हाळा नसता तर!

 मन आनंदाच्या भरात सैर होताच. माझं मन मला प्रश्न करू लागलं. वा!रे काळाच्या ओघात तू पण किती बदललास. तु ही या सर्व लोकांसारखा या उन्हावर कोसू  लागलास. खरंच तुला उन्हाळ्याचा एवढा त्रास व्हायला लागला. का?की तू ऋतू बरं जगणं विसरलास?
  
 माझं मन मला बोलू लागलं. आठवतं का तुला शाळेत असताना. तू माझा आवडता ऋतू उन्हाळा लिहायचा!

 मग आत्ताच का तुला हा एवढा वाईट वाटायला लागला. का तू खरंच ऋतू बरोबरच जगणं विसरला? हा प्रश्न खरंच माझ्या मनाला भिडला. अन मला ते दिवस आठवायला लागले.
  
 माझा आवडता उन्हाळा... याची मी खूप खूप वाट पाहत असे. याच उन्हाळ्याच्या दिवसात माझ्या शाळेला सुट्टी असेल. सुट्टी असल्यामुळे मला उन्हाळ्याच्या दिवसात खूप खूप खेळायला मिळत असे. अभ्यासाचा त्रास नसल्यामुळे रोजचा दिवस खूप नवीन वाटत असे. याच उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मी पोहायला शिकलो होतो. माझ्या गावातच नदी असल्यामुळे आम्ही मित्र सवंगडे दिवसभर मनसोक्त पोहत असे. भूक लागेपर्यंत पोहून झाल्यावर आम्ही कोणाच्या  आंब्याच्या झाडाला आंबे लागले आहेत का ते पाहत सगळं गाव हिंडत असेल. चोरून चोरून आंबे खाण्याची मज्जा काही वेगळीच होती. कारण हा आंबा पण ना आम्हा मुलांना सुट्ट्या लागल्यावरच उन्हाळ्यात बहरून येत असे. उन्हाळ्यात मनसोक्त आंबे  खाऊन  झाल्यावर आम्ही त्या आंब्याच्या को यांचा खेळ खेळत असे. कारण आमच्या बालपणी आत्ताचा बालपण हिरावून घेणारा मोबाईल नव्हता.   

तुझं बहारनं निस्वार्थ  आंबा
      गावरान मातीचा सुगंध, विहिरीचा थंडावा आणि                  आंब्याची सावली - ग्रामीण शांततेचे एक चित्र
       

 या उन्हाळ्यात खाण्याची नुसती मेजवानी असे. कारण आई संपूर्ण उन्हाळ्यात काही ना काही उन्हाळे काम करत असे.
 तिने केलेल्या पापड्या,कुरडया, लोणचे, सांडगे,पापड,शेवया,
 आशा एक ना अनेक कितीतरी पदार्थांची उन्हाळ्यात रेलचेल असे. मला आजही ती उन्हाळ्यातील दुपार आठवते. त्यावेळी उन्हाळ्यात शेवया करताना शेजारच्या काकू मावशी, अगदी दिवस दिवसभर एकमेकींच्या घरी जाऊन किती मदत करत असत. कोण सूर्या फिरवत असे, कोण त्याच्यात कणिक भरत असे, कोण शेवया अलगद सोडून सुपावर घेत असे, तर कोण  उन्हामध्ये वाळत घालत असे. किती मनसोक्त मदत करत होती ही लोक एकमेकांना. आणि आता आपण आपल्याला किती मर्यादित करून ठेवला आहे. ना आपण कोणाच्या घरी जातो ना आपल्या घरी कोण येतं.

 उन्हाळ्याच्या सुट्टीत मी मामाच्या गावी जात असे. मामाने केलेला लाड. मामाच्या गावी नदीमध्ये दिवस दिवस पोहलेलो. सगळं सगळं मला आठवत होतं. सुट्टी संपत असताना मामाने परत सोडवायला येताना, घेतलेली नवीन कपडे घालून मन अगदी सुखानं फुलून जात होतं 
हरवलेले बालपण..
           नदीचा झरझर वाहणारा प्रवाह आणि बालपणाचा               निरागस आनंद - निसर्गाचे खरे सुख!


  असंच काही मी त्या उन्हाळ्याच्या आठवणीत हरवून गेलो होतो. तेवढ्यात उन्हाची  एक झळई जवळून गेली. अन माझं मन मला म्हटलं कुठं हरवलास. आता तर थोड्या वेळापूर्वी तू या उन्हावर कोसत होता. मी म्हटलं नाही रे मी फक्त या सिमेंटच्या जंगलात त्याच्याबरोबर जगणं विसरलो होतो. पण मला आता सगळं आठवत आहे. याच उन्हाळ्यात शेतकरी आपली शेती नांगरत असे. त्यावेळी लहानपणी मी कितीतरी वेळा शेत- नांगरताना नांगराच्या बरोबर बैलाच्या पाठीमागे फिरत असे.
 उन्हाळ्यात शेतकरी आपली शेताची कामे आटोपून थोडा निवांत होत होता. त्यामुळे गावात उन्हाळ्यात जत्रा यात्रा भरत असे. उन्हाळ्यात गावाच्या यात्रेत घेतलेला आनंद मला आठवत होता. उन्हाळ्यातच आमच्या गावात देवाचा सप्ताह भरत असे. गावातील सर्व लोक रात्री एकत्र येत. त्यावेळी मला वाटे जणू काय हा उन्हाळ्याच सर्वांना एकत्र आणत आहे.

 उन्हाळ्यामध्ये गावाकडे लगीन सराई मोठ्या प्रमाणात होत होती. त्याकाळी गाडीच्या टपावर बसून जाऊन ऊन वारा खात लग्नाला गेल्याचा आनंद आजच्या एसी गाडीमध्ये बसून जाऊन सुद्धा मिळत नाही. हिरव्या पानाच्या पंतरवाळीची जागा आता थर्मासच्या पत्रवाळीने घेतली. त्यावेळी उन्हाळ्यात मंडपामध्ये पंक्तीमध्ये बसून जेवणाचा आनंद आजच्या हॉलमध्ये मिळत नाही.
 त्यावेळी लहानपणी उन्हाळ्यात आमचं सगळं कुटुंब रात्री ओट्यावर बसून एकत्र जेवण करत असे. त्या ओट्याला आईने हाताने सारवलेल्या शेणाचा सुगंध होता. त्या सारवलेल्या ओट्यावर जेवणाचा आनंद आज डायनिंग टेबलवर पण मिळत नाही.
 उन्हाळ्यात चांदण्या रात्री आईने सारवलेल्या ओट्यावर घेतलेली झोप. स्वर्ग सुखापेक्षा नक्कीच कमी नसेल याची जाणीव आता होत आहे. असे उन्हाळ्यातील एक ना अनेक सुवर्णक्षण आठवत असताना. दिवस मावळतीला झुकला. आग ओकणारा सूर्य ही आता शांत झाला होता. तसाच माझा त्याच्यावरचा राग ही शांत झाला होता. मी माझ्या मनालाच कोसू लागलो. उगाच आपण या उन्हाळ्यावर राग काढत होतो.

   त्यावेळी माझं मन बोलू लागलं. ऋतू तेच आहेत रे!
 माणसं बदलली..
    अन आपण ऋतू बरं जगणं विसरून गेलो!........
   
       "मनापासून लिहिलं, मनापर्यंत पोहोचो..."
                     लेखक -[ कुलदीप लोंढे ]

      "ही पोस्ट तुम्हाला कशी वाटली? आपला प्रतिसाद, मत,     किंवा आठवणी कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमचा रिप्लाय  ऐकायला आवडेल!"

# आठवणी गावाकडच्या..
 

Follow me: Facebook | Instagram

Share: Facebook | Twitter | WhatsApp

लेखक: कुलदीप लोंढे

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

"तुमचं मत नक्की कळवा! Google अकाउंट किंवा Anonymous म्हणून कमेंट करता येईल. तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहोत!"

Popular posts

😞 निःशब्द..... निरागस बाळा... 😞

प्रेमाच शव...हत्याकांडांच्या सावलीत..