"एक गोडी बाभळ आणि माझ्या बालपणीच्या आठवणी "
नका तोडू निरागस कोवळ्या कळयांना .....🙏🙏
मनात खूप भावना होत्या. पण आज बोलण्याचाही आणि लिहिण्याचाही धाडस होत नव्हतं. एखाद्या अपराध्यासारखं तब्ध होऊन एका कोपऱ्यामध्ये सुनसान बसलो होतो. डोळ्याच्या कडा आपोआप पानवत होत्या. षंड होऊनी नि:शब्द होण्यापलीकडे मी काय करू शकत नव्हतो. बातमीच तशी कानावर पडली होती.
चार वर्षाची कवळी मुलगी! माणूस रुपी राक्षसाच्या वासनेची शिकार होऊन देवा घरी गेली होती...
तिची असाह्य, बेबस अतर्क हाक माझ्या कानात शिस ओतल्यासारखी ओरडत होती....
नका तोडू कोवळ्या निरागस कळ्या.....
कळी… हा शब्द उच्चारताच डोळ्यासमोर येतं ते कोवळं, नाजूक, अजून पूर्ण उमलायचं असलेलं फूल. पण ही कळी फक्त निसर्गातली नाही—आपल्या समाजातली प्रत्येक मुलं ही अशीच कळी असते. त्यांच्या डोळ्यांत स्वप्नं असतात, मनात निरागसता असते, आणि आयुष्यभर फुलत राहण्याची क्षमता असते. त्या कळ्यांना योग्य वेळी प्रेम, संरक्षण आणि मार्गदर्शन मिळालं तरच त्या सुंदर फुलं बनतात. पण जेव्हा समाजातल्या काही विकृत प्रवृत्ती त्यांच्या आयुष्यावर आघात करतात, तेव्हा त्या कळ्या उमलण्याआधीच तुटून पडतात.
![]() |
| आजची कळी उदयाच सामर्थ्यवान फुलं आहे. जे जगाला सुंदर बनवेल.. |
त्या कोवळ्या जिवानं ज्या काय यातना भोगल्या असतील, त्यासाठी तर शब्दच नाहीत. पण ज्या मातीत हे घडलं त्यानं मन आणखीनच मेल्यासारखं झालं. आणि कुठेतरी आपण या मातीचा वारसा विसरत आहोत काय?याची बोचरी खंत मनाला वाटू लागली.
जगाला अभिमान वाटावा असं. आम्ही नेहमीच छाती ठोकून सांगत असतो. ही माती शाहू,फुले,आंबेडकरांच्या विचारांची आहे. आणि आज त्याच मातीत शर्मिने मान खाली जात होती. आणि आपण कुठेतरी त्या महापुरुषांच्या विचारांचा वारसा विसरत चाललो आहे की काय? अशी खंत मनाला वाटू लागली.
ज्या शिवरायांनी या मातीला स्त्री सन्मानाची शिकवण दिली. तिच्यावर अतिप्रसंग करणाऱ्या पाटलाचा चौरंग केला. जीच्या शिक्षणासाठी फुलेंनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं. तिच्या समतेसाठी आणि अधिकाऱ्यासाठी आंबेडकरांनी आपल्याला आदर्श घालून दिला. अगदी अलीकडच्या काळामध्ये मातंग मुलीवर अतिप्रसंग झाला म्हणून, हातात शस्त्र घेऊन विद्रह करणाऱ्या बापू बिरू वाटेगावकर. या सर्वांनी आम्हाला तिच्या सन्मानाचा, स्वातंत्र्याचा, तिच्या शक्तीचा, नेहमी सन्मान करण्याचाच वारसा दिला आहे. एवढा प्रगल्भ वारसा असणाऱ्या या मातीत.
चार वर्षाच्या मुली वरती अतिप्रसंग होऊन, मृत्यूच्या थारोळ्यात पडण्याची वेळ येते..
त्यावेळी मनाला एकच प्रश्न पडतो? वरती गेल्यावर या महापुरुषांना मी काय तोंड दाखवू. तुमच्या विचारांचा वारसा असणाऱ्या या मातीत. आज लाखो मुली रोज राक्षसी प्रवृत्तीच्या वासनेचा शिकार होत आहेत. आणि मी हतबल होऊन हे सगळं फक्त पाहत आहे. यासाठीच का? तुम्ही केला होता,तुमच्या जीवनाचा हट्टास. तुमच्या विचारांच्या वारसांची हा वासनेने बरबटलेला माणूस, रोज लक्तरे तोडत आहे. आणि ओरडून ही सांगते आहे,
हा शाहू,फुले,आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे.
त्यावेळी मात्र आपण सर्वांनी स्त्री सन्मानाची फक्त खोटी शाल पांघरली आहे. याची जाणीव मनाला होते. आजही ती आपल्या राक्षसरुपी वासनेची शिकारच बनते. अरे महाराष्ट्राच्या या मातीने, जिजाऊरुपी राजमाता पाहिली. अहिल्याबाई सारखी राष्ट्रमाता पाहिली, सावित्रीबाई फुलें सारखी शिक्षणाची गंगा पाहिली. संत मुक्ताई सारख्या दहा-बारा वर्षाच्या मुलीला आपण आईच्या रूपात पाहिलं. तिला माऊली म्हटलं. त्या याच मातीत
चार वर्षाच्या मुली वरती वासनेची शिकार होऊन, मृत्यूचे थारोळ्यात पडण्याची वेळ यावी..
![]() |
| सुंदर जगाची गोड स्वप्न पाहणारी मुलगी.. |
यापेक्षा माझ्या जीवनात कोणतीही मोठी खंत नसेल.आजच्या काळात आपण प्रगती, तंत्रज्ञान, आधुनिकता याबद्दल खूप बोलतो. पण या सगळ्या चमकदार प्रगतीच्या आड एक कटू वास्तव लपलेलं आहे—मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अजूनही गंभीर आहे. काही लोक स्वतःच्या विकृत विचारांमुळे मुलांच्या निरागसतेचा गैरफायदा घेतात. हे केवळ कायद्याने गुन्हा नाही, तर नैतिकतेच्या प्रत्येक मर्यादेचा भंग आहे. एखाद्या कळीवर आघात करणं म्हणजे केवळ त्या एका जीवाचं नुकसान नाही, तर तिच्या भविष्यातील प्रत्येक शक्यतेचा गळा घोटणं आहे.
मुलं ही विश्वासावर जगतात. त्यांना मोठ्यांवर विश्वास असतो—आई-वडील, नातेवाईक, शिक्षक, शेजारी… पण जेव्हा हाच विश्वास तुटतो, तेव्हा त्यांच्या मनावर खोल जखमा होतात. या जखमा बाहेरून दिसत नाहीत, पण आतून त्या आयुष्यभर त्रास देऊ शकतात. त्यामुळे मुलांचं रक्षण करणं ही फक्त कर्तव्य नाही, तर आपली सामूहिक जबाबदारी आहे.
समाज म्हणून आपण काय करू शकतो? सर्वात आधी, जागरूकता. आपण आपल्या चुकातून काहीच शिकत नाही हेच आपल दुर्दैव आहे. कोपर्डीची ताई, दिल्लीची निर्भया,बदलापूर, आताच नसरापूर. या सारखे किती तरी अमानवीय कृत्य अगदी आपल्या दारापर्यत येऊन ठेपले आहे.आर्थिक प्रगती आपण कितीही करत असलो तरी माणूस म्हणून आपली मानवता रसातळा जात आहे. आपण अधिकाआधीक भावना शून्य बनत चालो आहे. त्या साठीच आपल्याला समाजात विश्वाचं नातं निर्माण करायला हवं.
मुलाना आपण बोलायला शिकवणं, भीती न बाळगता आपली समस्या सांगता यावी यासाठी त्यांच्याशी विश्वासाचं नातं निर्माण करणं महत्त्वाचं आहे. पालकांनी आणि शिक्षकांनी मुलांच्या वागण्यात बदल दिसला तर तो दुर्लक्षित न करता संवेदनशीलतेने त्याकडे पाहायला हवं.
दुसरं म्हणजे, गप्प न बसणं. आपल्या आसपास काही संशयास्पद घडत असल्याचं जाणवलं, तर दुर्लक्ष करणं हा उपाय नाही. आवाज उठवणं, योग्य व्यक्तींना कळवणं, आणि त्या मुलीला मदत मिळवून देणं ही आपली जबाबदारी आहे. अनेकदा समाज “काय म्हणेल?” या भीतीमुळे आपण शांत राहतो, पण हीच शांतता अनेक कळ्यांच्या आयुष्यावर भारी पडते.
![]() |
| विकृत वासनेनं उद्याच भविष्य उन्मळून जाताना.. |
तिसरं म्हणजे, कायद्याची जाणीव. मुलींच्या संरक्षणासाठी कठोर कायदे अस्तित्वात आहेत. त्यांचा योग्य वापर झाला तर अनेक गुन्हे रोखता येऊ शकतात. पण त्यासाठी लोकांनी पुढे येणं आवश्यक आहे. न्याय मिळवणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच गुन्हे होऊ न देणंही महत्त्वाचं आहे.
आपण मुलांकडे कसं पाहतो, त्यांच्याशी कसं वागतो, हेच त्यांच्या भविष्याचं बीज ठरतं. प्रेम, आदर आणि सुरक्षितता या तीन गोष्टी जर प्रत्येक मुलाला मिळाल्या, तर कोणतीही कळी तुटणार नाही. प्रत्येक कळीला उमलण्यासाठी वेळ, जागा आणि संरक्षण हवं असतं—आणि ते देणं हीच खरी माणुसकी आहे.
चला, आपण सगळे मिळून एक असा समाज उभा करूया जिथे प्रत्येक मूल निर्भयपणे हसू शकेल, खेळू शकेल, आणि आपल्या स्वप्नांच्या दिशेने उडू शकेल. कारण कळी तुटली तर फुल कधी उमलत नाही—पण जर ती जपली, तर तीच उद्या सुगंधाने सगळं जग भरून टाकते.
शेवटी आपणच म्हणतो ना, मुलं ही देवाघरची फुलं..
नका तोडू कळ्याना—त्या फक्त कळ्या नाहीत, त्या आपल्या भविष्याची फुलं आहेत.
त्या निरागस कोवळ्या मुली साठी पुन्हा एकदा निःशब्द..
आता आपल्याला प्रगती फक्त आर्थिक स्तरावर मोजून चालणार नाही. मी किती मोठ्या शहरात राहतो. किंवा मी किती पैसे कमवतो. यावरूनच मी प्रगत आहे हे ठरणार नाही.
मला माझ्याबरोबर समाज किती प्रगत होत आहे, तो वैचारिक रित्या किती प्रगल्भ होत आहे. त्याला सामाजिक कर्तव्याची, सामाजिक समतेची, आणि मानवतेची किती जाणीव आहे. हे मला सतत पहावं लागेल.
तरच मी खऱ्या अर्थाने महापुरुषांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यास पात्र ठरेल. असं मला वाटतं..
तुम्हाला काय वाटतं कॉमेंट्स मध्ये नक्की कळवा..
तुमचं मत हिच आमची खरी संपत्ती आहे. 🙏🙏
“आज त्या निरागस मुलीसाठी दोन अश्रू ढाळण्यापेक्षा, उद्या कोणतीही कळी तुटू नये यासाठी समाज म्हणून जागं होणं जास्त गरजेचं आहे…”
तुमचा ब्लॉग लेखक...
✍️ लेखक : कुलदीप लोंढे https://www.vicharkahoor.in
Follow me: Facebook | Instagram
Share:
Facebook |
Twitter |
WhatsApp
लेखक: कुलदीप लोंढे
sundar lekh
उत्तर द्याहटवाkhup sundar
उत्तर द्याहटवाkharokharch nishbd
उत्तर द्याहटवा