"एक गोडी बाभळ आणि माझ्या बालपणीच्या आठवणी "

इमेज
उन्हाची तीव्रता आणि अंगाची लाही.. ' नेहमीच येतो उन्हाळा ' या वक्तीप्रमाणे उन्हाळा दरवर्षी आपल्या जीवनात येतो. लहानपणी माझा सगळ्यात आवडता असणारा ऋतू उन्हाळा. यावरती मी आधीच्या ब्लॉग वरती लिहिलेच आहे. लहानपणीच्या त्या अनेक असंख्या आठवणी आजही  मनाच्या कोपऱ्यामध्ये ताज्या आहेत. आता गाव सुटलं, तशा त्या आठवणीही मागे सुटत गेल्या. शाळेच्या सुट्टीत मनसोक्त जगलेला उन्हाळा. आज मात्र मला बोचरा वाटत होता.  वर्तमानपत्रात रोजच उन्हाची तीव्रता वाचत होतो. कधी 42, 43, अगदी 45,46 ही त्याची तीव्रता आकड्यांमध्ये मोजत होतो. विज्ञानाच्या सुख -सोयींनी झालर पांगरलेला मी. आज माझ्याकडे स्लॅबच घर आहे. फॅन आहे,कुलर आहे. तरीही या उन्हाळ्यापासून मी का बेचैन आहे? आधी तर हे माझ्याकडे काहीच नव्हतं. तरी मी किती आनंदी होतो.  लहानपणीच्या आठवणीतील बाभळीचे झाड   काय होतं माझ्या सुखाचं, माझ्या आनंदाचे कारण? आज माझं मन पुन्हा जुन्या आठवणी इकडे खेचू लागलं. या उन्हाची कसलीही तमा न बाळगता, मन तिच्या सावलीत बागडू लागलं. सिमेंटच्या जंगलातून मला खेचून आणणारी आणि या रखरखत्या उन्हामध्ये तिच्या सावलीमध्ये ...

पांडू -आजच्या तरुणांचं एक वास्तव रूप!

 ओळखीतून मैत्रीकडे प्रवास.

 मी नेहमीप्रमाणे रोजच्यासारखं जिम मध्ये व्यायाम करत होतो. मी आणि माझ्या दोन-तीन मित्रपरिवारांचा हा नेहमीचा दिनक्रम. न चुकता आम्ही जिम मध्ये जमणार आणि मनसोक्त व्यायाम करणार. व्यायामाचे हे वेड मला पहिल्यापासूनच. लहानपणापासून गावाकडे ही व्यायाम केलेला. आता गेली  तीन-चार वर्ष झाले जिम घनिष्ठ नातं तयार झालं. कुठेही मनाला सुकून नाही भेटला, तरी जिम मध्ये मनाला समाधान मिळणार हे मात्र नक्की! 

 आयुष्यामध्ये कशाच तरी वेड असावं! आणि मला हे जिमच लागलेलं वेड! असो. काही ओळखीचे तर, काही अनोळखी माणसानी जिम सतत भरलेली. आपल्याबरोबरच कधी नवीन मुलांना काही माहिती देत. जिम करणं हे माझं रोजचंच. आजही काही नवीन आणि काही जुन्या लोकांनी जिम भरलेली.

लग्न जुळत नाही. या दुःखातील एक तरुण
 दुःखात कायम साथ देणारे जिवलग मित्र 

त्यातीलच कुणीतरी एक नवीन मुलगा. माझ्याजवळ येऊन काहीतरी माहिती विचारू लागला. मी त्याला आज पहिल्यांदाच पाहिलं होतं. साधा आणि निरागस चेहरा! ग्रामीण भागातून आला असेल असं पाहताक्षणी वाटलं. मी त्याला मनापासून माहिती सांगू लागलो. आणि तोही माझ्याबरोबर मनापासून व्यायाम करू लागला. व्यायाम आणि दोघांच्या गप्पांमध्ये दोन तास कसे गेले कळलंच नाही. उद्या नक्की ये असं सांगून मी त्याचा निरोप घेतला. त्याच्यानंतर त्याची आणि माझी गेल्या काही दिवस जिम मध्ये सतत भेट होत राहिली. अशा या  एका ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं होतं. आणि माझ्या नवीन मित्राचे नाव होतं.' पांडू '

 पांडूचं संघर्षमय जीवन..

 कधी जिम मध्ये तर कधी रविवारच्या सुट्टीच्या दिवशी पांडू आणि मी हमखास भेटत असे. दोघांमध्ये मनसोक्त गप्पा रंगत. पांडूच्या मनमोकळ्या स्वभावानं आणि त्याच्या संघर्षमय जीवनान माझ्या मनात खूप आपुलकी निर्माण झालेली. पांडू चे वडील लहानपणीच वारलेले. आईने  त्याला कबाड कष्ट करून लहानाचं मोठं केलेलं. काम करत करत पांडूचे शिक्षण गावाकडे झालं होतं. मोहोळ या दुष्काळी तालुक्यातील त्याचं एक छोटस गाव होतं.म्हणतात ना, 'जीवनामध्ये असेल काय उणं, तर डोळ्यासमोर येतो मुंबई पुणं' असाच पांडूही आपल्या पोटाचे खळगी भरण्यासाठी पुण्यामध्ये आला होता. पुण्यामध्ये आल्यावर त्यांने काम करत करत आयटीआय चे शिक्षण पूर्ण झालं.

 पण म्हणतात ना, काही लोकांच्या नशिबालाचं संघर्ष पूजलेला  असतो. तसंच पांडूचं ही झालेलं. आयटीआय नंतर त्यांने नोकरीसाठी खूप प्रयत्न केले. पण कुठेच यश पदरात पडला नाही. पण पांडू त्याने खचला नाही. जन्मापासूनच तो संघर्ष करत आला होता. गेले दहा-बारा वर्ष झालं तो एका कंपनीमध्ये सेक्युरिटी गार्ड चे काम करत आहे. तीन शिपा,तीन ऋतू, त्याच हे कष्ट मीही गेल्या चार पाच वर्षापासून पाहतोय.

सेक्युरिटी गार्ड च काम करणारा एक तरुण
 सिक्युरिटी गार्डचं प्रामाणिक काम करणारा तरुण 

 संघर्षाने  कधीही खचून न गेलेला पांडू. आपल्या आईला घेऊन दहा-बारा वर्षे झालं पुण्यात राहत आहे. आपलं काम आणि आपलं घर यामध्ये स्वतःला वाहून घेतलेल्या पांडूचा मला नेहमी कौतुक वाटतं. भेटल्याच्या नंतर मारतो आम्ही खूप मनसोक्त गप्पा मारतो. एकमेकांचा दुःख एकमेकांना सांगून मन हलकं करतो. कष्टाने कधी न खचून जाणारा पांडू. मला अलीकडील काही काळात दुःखी आणि मनातून खचून गेल्यासारखा वाटत होता. म्हणून मी त्याला एकदा विचारलं काय झाल आहे? पण बोलताना त्याच्या डोळ्यांमध्ये फक्त पाणी होतं. त्याला शब्द फुटत नव्हते, आणि त्याचा एक एक शब्द माझ्या काळजाला चिरत होता. नियती किती कठोर असते ना!

 आईचं दुःख पाहू शकत नाही?

त्यादिवशी पांडूच्या दुःखाचा जणू काही सागरच माझ्यासमोरून वाहत होता. त्याचं बोलणं माझ्या डोळ्यात पाणी आणत होतो. डोळ्यातील अश्रूंबरोबर त्याचे शब्द फुटत होते.

 वडील लहानपणीच वारले. आईने कष्ट करून लहानाचं मोठं केलं. मीही जसं कळत आहे तसं कष्ट करत आहे. स्वतःच्या पायावर आयटीआय करून नोकरीचा ही खूप प्रयत्न केला. पण तिथेही दुर्दैव माझ्यासोबतच होत. नोकरी लागली नाही. त्यामुळे गेली दहा-पंधरा वर्षे झाले, कंपनीमध्ये सेक्युरिटी गार्डच काम करत आहे. पोटा पुरता कमवतो. पोटाला चिमटा घेऊन थोडाफार बँक बॅलन्स ही ठेवला. आईला सोबत घेऊन माझ्या या संघर्षाचा गाडा मी ओढतच आहे. कुलदीप मला कष्टाच काय वाटत नाही. कष्ट माझ्या पाचवीलाच पुजलं आहे. ते मी आयुष्यभर करेल. पण आई आता वेगळ्याच दुःखात डुबून गेली आहे. आणि तिचं हे दुःख मी पाहू शकत नाही.

 पांडू आजच्या तरुणांचा एक आरसा.

 पांडूच आणि आजच्या लाखो तरुणांचं एकच दुःख होतं. 'लग्न'! पांडू पुढे सांगू लागला. दहा-बारा वर्षांपूर्वी गाव सोडलं. गावाकडे प्रॉपर्टी अशी नावाची काय चीजच नाही. गेली दहा- बारा वर्षा झाली पुण्यात राहत आहे. स्वतःचं घर नाही, हातामध्ये नोकरी नाही. आहे ती अशी सिक्युरिटी गार्डची. मला या माझ्या जीवनाच आणि कष्टाचाही काही वाटत नाही.मला आता त्याची सवय झाली आहे. पण आईचं दुःख वेगळ आहे. आता वय झाला आहे. दोनाचे चार व्हावे  असे तिला वाटतं. गेली पाच सहा वर्ष झाले मी मुली पाहत आहे. पण काय करणार कुठूनच होकार येत नाही.

 मला या वास्तवाची जाणीव आहे. माझ्यासारखेच लाखो तरुण आज लग्न होत नाही म्हणून, समाजाच्या मानसिक त्रासाला समोर जात आहेत. मला आता या दुःखाचा काय वाटत नाही. पण आई या दुःखात पार बुडून गेली आहे. याच मला खूप दुःख वाटतं.

दुःखामध्ये आपल्या आईला साथ देणारा पांडू
 आईचा मानसिक आधार बनलेला पांडू 

 बोलता-बोलता पांडू शांत झाला. नकळत त्याने डोळ्याच्या कडा पुसल्या. तुझ ही दुःख तेच म्हणून, नकळत माझ्या खांद्यावर हात ठेवला. आणि त्याच ही खरंच होतं. मी ही सिंगलच होतो. मीच काय महाराष्ट्रातील लाखो तरुण, लग्न होत नाही  म्हणून चिंतेने ग्रासून गेले आहेत.

 समाज म्हणून आपणच याला जबाबदार..

 कटू असलं तरी सत्य वास्तव आहे. आज मुलांना लग्नाला मुली मिळत नाहीत. पण ही वेळ आपणच आपल्या मुलांवर आणली. "वंशाला दिवा पाहिजे म्हणून, आपण पाहिजे तेवढी मुलींची भ्रूणहत्या केली ". आणि आज तीच नियती. 

या मानव जातीच्या समाजाला त्यांच्या मुलांचा वंश वाढवण्यासाठी मुलीच भेटू देईनाशी झाली. किती कठोर बदला घेतला ना, नियतीने आपल्यावर. पण आता सगळं संपलं होतं. 'आपणच ते पेरलं होतं. आणि आपल्यासाठीच ते उगवलं होतं'.

 मी तर भोगत आहे,भोगत राहील. पण येणाऱ्या पिढीला ही हेच दुःख मिळू नये. म्हणून मला यातून काहीतरी शिकावच लागेल.त्या साठी मला माझ्या चुका मान्य करून, त्यावर उपाय ही मलाच शोधावे  लागतील.

 समस्येचे जाणीव आणि उपाय..

आजच्या काळात सुशिक्षित, कमावत्या आणि चांगल्या घरच्या तरुणांसमोर एक मोठी समस्या उभी ठाकली आहे – ती म्हणजे लग्नासाठी मुलगी मिळणे कठीण झाले आहे. "मुलगा निर्व्यसनी आहे, स्वतःचे घर आहे, चांगली नोकरी किंवा व्यवसाय आहे, तरीही मुलगी मिळेना," अशी हतबलता अनेक आई-वडील व्यक्त करताना दिसतात.

एकेकाळी लग्नासाठी मुलांचे उंबरठे झिजवले जायचे, पण आज परिस्थिती पूर्णपणे उलटी झाली आहे. ग्रामीण भागापासून ते अगदी आयटी सिटीजपर्यंत मुलांची लग्ने का होत नाहीत, हा आज केवळ एका कुटुंबाचा प्रश्न नसून एक गंभीर सामाजिक विषय बनला आहे. 

या समस्येची नेमकी कारणे काय आहेत आणि यावर काय मार्ग काढता येईल, हेच प्रश्न आज माझ्या डोळ्यासमोर पांडूच्या आजच्या बोलण्यामुळे उभे राहिले.

लग्नासाठी मुलगी न मिळण्याची काही प्रमुख कारणे :

1. विस्कळीत झालेले स्त्री-पुरुष प्रमाण:

या समस्येचे सर्वात मोठे आणि मूळ कारण म्हणजे भूतकाळात झालेले स्त्रीभ्रूणहत्या आणि त्यामुळे घटलेली मुलींची संख्या. आजच्या घडीला उपवर तरुण आणि तरुणींच्या संख्येत मोठी तफावत निर्माण झाली आहे. मुलांची संख्या जास्त आणि मुलींची संख्या कमी असल्यामुळे नैसर्गिकरित्याच मुलींना मागणी वाढली आहे.

2. मुलींचे वाढलेले शिक्षण आणि आर्थिक स्वावलंबन-

आजच्या मुली शिक्षण आणि करिअरमध्ये मुलांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत. अनेकदा मुलींचे शिक्षण मुलांपेक्षा जास्त असते. मुली आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्यामुळे त्यांची जीवनसाथी निवडण्याची निकष बदलले आहेत. त्यांना आपल्या तोडीचा किंवा स्वतःपेक्षा जास्त सुशिक्षित आणि प्रगतीशील विचारांचा जोडीदार हवा असतो.

3. सरकारी नोकरी आणि 'स्थिरते'ची अवास्तव अपेक्षा-

ग्रामीण असो वा शहरी भाग, आजही मुलीकडच्या लोकांचा ओढा 'सरकारी नोकरी' किंवा 'अब्जावधींचे पॅकेज' असलेल्या मुलांकडे जास्त असतो. शेती करणाऱ्या किंवा छोटा-मोठा व्यवसाय करणाऱ्या गुणी तरुणांना यामुळे अनेकदा नाकारले जाते. 'मुलगा सेटल पाहिजे' या एका अटीमुळे अनेक सुयोग्य मुले मागे पडतात.

4. कुंडली, पत्रिका आणि अवाजवी अटी-

अजूनही आपल्या समाजात पत्रिका जुळणे, मंगळ, गुण मिलन यांसारख्या गोष्टींना फाजील महत्त्व दिले जाते. मुलगा-मुलगी एकमेकांसाठी योग्य असूनही केवळ पत्रिकेत गुण जुळले नाहीत म्हणून नाकारले जाते. यामुळे लग्नाचे वय उलटून जाते.

या समस्येवर काय उपाय करता येतील? 

आयुष्याच्या चिंतेत असणारा तरुण
 लग्न होत नाही म्हणून चिंतेत असणारा तरुण 

ही समस्या जर सोडवायची असेल, तर जुनी विचारसरणी बदलून काळासोबत पुढे जाणे गरजेचे आहे. त्यासाठी समाजाची अशी मानसिकता आपण करू शकतो का?

अपेक्षांना मुरड घालणे: मुलांच्या आणि मुलींच्या दोन्ही बाजूंनी आपल्या अवास्तव अपेक्षा कमी केल्या पाहिजेत. अपेक्षांची यादी जितकी लहान असेल, तितके लग्न जमणे सोपे होईल.

शेती आणि व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे: फक्त नोकरीवालाच मुलगा पाहिजे हा अट्टहास सोडला पाहिजे. कष्टाळू शेतकरी किंवा प्रामाणिक व्यवसाय करणारा तरुणही उत्तम आयुष्य देऊ शकतो, हा विश्वास समाजात निर्माण व्हायला हवा.

विचारांचे मिलन महत्त्वाचे, पत्रिकेचे नाही: कुंडली जुळवण्यापेक्षा दोन व्यक्तींचे विचार, स्वभाव आणि सवयी जुळतात का, याला प्राधान्य दिले पाहिजे.

मुलांनी स्वतःमध्ये बदल करणे: आजच्या काळातील मुलींना समजून घेणारा, त्यांच्या करिअरला पाठिंबा देणारा आणि घरकामात मदत करू शकणारा जोडीदार हवा असतो. मुलांनी आपली विचारसरणी आधुनिक ठेवली पाहिजे.

मुलांची लग्ने का होत नाहीत? या प्रश्नाचे उत्तर केवळ पैशात किंवा हुंड्यात नाही, तर बदलत्या सामाजिक मानसिकतेत आहे. जोपर्यंत आपण जात, पात, पत्रिका आणि अवास्तव अपेक्षांचे जुने पडदे बाजूला सारत नाही, तोपर्यंत ही समस्या सुटणार नाही. लग्न हे दोन जीवांचे आणि कुटुंबांचे मिलन आहे, तिथे गुणवत्तेला आणि स्वभावाला महत्त्व देणे हाच यावरील खरा उपाय आहे.

 पांडूच्या आजच्या या  बोलण्यातून मी ही खूप काही शिकलो. पांडूचे हे दुःख एकट्याच दुःख नव्हतं. तो आज समस्त तरुणांचा प्रतिनिधी होता. 

“कष्ट करणारा प्रत्येक पांडू अधिकारी नसतो…

पण म्हणून तो वाईट मुलगा ठरत नाही.

त्यालाही प्रेम, संसार आणि माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहेच ना?”

 तुम्हाला काय वाटतं? पांडू सारख्या कित्येक तरुणांच्या स्वप्नांना आपण बळ द्यायला हवं! ,की त्यांनी असंच एकाकी संघर्षात जीवन जगाव!

 तुमचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा..

 आपलाच ब्लॉगर लेखक: कुलदीप लोंढे..




 


Follow me: Facebook | Instagram

Share: Twitter | WhatsApp WhatsApp

लेखक: कुलदीप लोंढे

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

"तुमचं मत नक्की कळवा! Google अकाउंट किंवा Anonymous म्हणून कमेंट करता येईल. तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहोत!"

Popular posts

😞 निःशब्द..... निरागस बाळा... 😞

प्रेमाच शव...हत्याकांडांच्या सावलीत..